सुधागड सरसगड ट्रेक

नेहमीचा ब्लोग लिहीणारा व्यक्ती आमच्या सोबत नसल्याने ह्यावेळी ब्लॉग लिहिण्याची जबाबदारी चेतन आणि मी घेतली, कारण ऐकून लिहिण्यापेक्षा अनूभवून लिहिलेले चांगलेच नाही का ????, मित्रा दिपक, तुझ्या सारखे लिखाण आम्हाला जमणार नाही, तरी सुध्दा थोडासा आमचा प्रयत्न……
रतनगड स्वारी नंतर कोठे याचा विचार सुरू झाला. काही दिवसांत दिपकने आम्हाला सुधागड बद्दल सांगितले. मग दिवस ठरवला, वेळ ही ठरविली.  ठरलेल्या ठिकाणी मी, चेतन, सूशील, किशोर आणि जयवंत भेटलो. थोड्याच वेळात महेश गाडी घेऊन आला. गाडीत बसल्यावर चेतनने बाप्पा मोरया केला आणि आम्ही स्वप्ननगरी ला राम राम करून गाडी पाली गावच्या दिशेला लागली. पुढे काही वेळात चहाचा मुड झाला. आम्ही चहा प्यायला थांबलो. सर्व मी घरातून आणलेला चहा पियाले.  चहा तशी छान झालेली, फक्त साखर थोडी जास्त झाली. चहा पिऊन झाल्यावर गाडी पुन्हा पाली मार्गावर लागली आणि तेवढ्यात माझा डोळा लागला. मला जाग आली तेव्हा आम्ही सुधागड च्या पायथ्याशी पोहोचलो होतो. सर्वत्र अंधार पसरला होता. आम्ही सकाळ होण्याची वाट पाहू लागलो.
आम्ही ६ च्या सुमारास सकाळ च्या अंधुक प्रकाशात गड चढायला सुरुवात केली. आम्ही थोडच पुढे आलो असू, तेवढ्यात चेतन ने तिरंगा राहील्याची आठवण केली. मग चेतन आणि मी गाडी तील तिरंगा घेऊन पुन्हा एकदा गड चढायला सुरुवात केली. आम्ही जरा पटापट पाऊले टाकत होतो कारण उरलेले चौघे खूप पुढे गेले होते. मी आणि चेतन गडा नजिकच्या लोखंडी पाय-या जवळ पोहचणारच होतो की तेवढ्यात सूशील ने कैमेराची ब्याटरी राहिल्या ची आठवण केली आणि ह्या वेळी चेतन आणि सूशील अर्धा गड उतरले. आम्ही त्यांची वाट पाहत फोटो काढायला आणि गडावरुन दिसणारे निसर्गाचे सौंदर्य टिपायला सूरुवात केली. थोड्याच वेळात सूशील आणि चेतन आले, आणि आम्ही पुन्हा गड चढण्यास सुरुवात केली.
‌‌आम्ही हळूहळू गडाच्या जंगल वाटेतून वर जात होतो. सूर्यनारायण सुद्धा हळूहळू वर येऊन दर्शन देत होते. जरा पुढे गेल्यावर आम्हाला एक छोटासा झरा लागला, आम्ही तेथे थोडे विश्राम करुन पुढे निघालो. थोड्याच वेळात आम्ही गडाच्या पहिल्या बुरुजावर पोहोचलो. तेथे थोडे फोटो काढून आम्ही गड फिरण्यास सुरुवात केली. गडावर पोहोचल्यावर आम्हाला समोर दिमाखात उभा असलेला तैला-बैला गड आणि डावीकडे ऐटीत उभा असलेला सरसगड दिसत होते. आम्ही चालत चालत गडाच्या Eco पोईंट ला पोहोचलो. हो, जिथून आपण आवाज दिला की आपलाच आवाज आपल्याला परत ऐकू येतो तोच Eco पोईंट. ही ही एक निसर्गाची किमया , नाही का ??? आम्ही त्या कोपऱ्या वरुन व तरतरहे चे आवाज काढू लागलो आणि त्या परतून येणार्या आवाजाला कैद प्रयत्न करू लागलो. पण जोरात वाहणाऱ्या वाऱ्यामुळे ते काही शक्य झाले नाही. झाले तेही एकदाच.
 वाड्यामधील लांब चुल थोड्याचथोड्याच पुढे गेल्यावर आम्हाला पडीक व्दार दिसले, त्याच्याच जरा पुढे आम्हाला सफेद कमळाचे तलाव दिसले. त्याच पुढे आम्हाला तिकडे राहणारे गडाचे वंशज रामबाबा भेटले. त्यांनी आम्हाला महादरवाजा कडे जाण्याचा मार्ग सांगितला आणि वाडा दाखविला. साडे तीनशे वर्षांपूर्वी चा वाडा अजूनही त्याचा खालचा मजला टीकून होता आणि तो अजूनही जिवंत आहे असे भासत होते. बाबांनी सांगितलेल्या वाटेवर आम्ही चालू लागलो. जाताना आम्ही भोराई देवीचे दर्शन घेतले, तेथून सरळ आम्ही जंगल वाटेतून आम्ही महादेव मंदिराजवळ पोहचलो.
 त्या मंदिरामध्ये गडाची ऐतिहासिक आणि भौगोलिक माहिती दिली आहे.मंदिराच्या बाजूला समाध्या आहेत. आम्ही तेथे थोडा वेळ विश्राम करुन महादरवाजा कडील परतीची वाट शोधू लागलो. शेवटी किशोर लागले ती मारुती मंदिरा समोर ची वाट दिसली, तसे आम्हाला बाबांनी सांगितले होते. आम्ही त्या वाटेने चालू लागलो. महेश ला गाडी चालवायची असल्यामुळे आम्ही तेथेच त्याला आराम करायला सांगितले आणि सोबत जयवंत लाही सांगितले, पण महादरवाजा ची ओढ त्यांना थांबू देत नव्हती.

सुधागडावर जाणारी लोखंडी शिडीची वाट
                                                             
 सुधागड वरील महादरवाजा
आम्ही थोडेच चालले असू, गडाची उतरन उतरले असू, आम्हाला सूधागडचा महादरवाजा दिसला.
सुधागडचा महादरवाजा
पूर्ण कातळीत कोरलेला, अवाढव्य असा महादरवाजा, कोरीव कमान आणि त्याच्या दोन्ही बाजूस असलेले चक्र शोभून दिसत होते. दरवाजाच्या दोन्ही कोपऱ्यात असलेल्या शरनशिल्पाची तर बातच निराळी होती. तेथे किशोर आणि मी गारद दिली. आता आम्हाला परतीला दोन वाटा होत्या, एक आलो तसे जायाचे किंवा महादरवाजा खालील वाट. आम्ही दरवाजा खालील वाट निवडली आणि आम्ही गड उतरु लागलो. वाट तशी मोठमोठ्या दगडांची होती. महेश ची सैंडल घसरत असल्यामुळे तो हळूहळू चालत होता, आणि मी त्याच्या सोबत होतो. गड उतरताना आम्हाला एक वेगळीच चिंता लागून राहिली होती कारण उतरणारी वाट गडापासून दूर-दूर जात होती, म्हणजेच विरुद्ध दिशेला जात होती. आम्ही जे होईल ते होईल म्हणत आम्ही खाली उतरायला सुरुवात केली कारण येवढे मोठे दगड चडण्याची कोणात ताकद उरली नव्हती.
आम्ही हळूहळू गड उतरु लागलो. थोड्याच वेळात सर्वांच्या चेहऱ्यावर हसू उमटू लागले, थोडेसे खुष ही झाले, कारण ती दगडांची वाट संपली होती आणि एक सपाट वाट गडाच्या दिशेने फिरताना दिसली. आम्ही त्या वाटेने चालयला सुरुवात केली, थोड्या वेळात आम्हाला वाटेत एक झरा लागला, आम्ही सर्वांनी तिथे तहाण भागवली आणि पुढे निघालो. वाट तशी जंगलाची होती. जवळजवळ अर्धा-पाऊण तास चालल्यानंतर आम्ही त्या जंगल वाटेतून बाहेर पडलो. थोड्याच वेळात आम्ही एका गावात पोहोचलो. गावाचे नाव होते पाच्छापूर. आम्ही आता त्या गावाच्या jiडांबरी रस्ता लागला आलो होतो. किशोर, जयवंत आणि सूशील पुढे निघून गेले होते. मी, चेतन आणि महेश मागून चालत होतो. थोड्याच वेळात आम्हाला झाडाचा आडोसा मिळला. आम्ही तेथे आराम करायचे ठरविले. थोडा वेळ झाल्यावर सूशील ने महेश ला गाडी इथवर आणायला सांगितले. पाच-दहा मिनिटे झाल्यानंतर महेश आणि चेतन गाडी आणायला निघाले. दहा पंधरा मिनिटांनी आम्हाला मोटरसायकल येताना दिसली, त्या बाईक वाल्याला थांबवून मी ही गाडी जवळ निघालो.
थोड्याच वेळात मला समोर महेश गाडी घेऊन येताना दिसला, सोबत चेतन पण होता. मी बाईक वाल्याचे आभार मानून गाडीत बसलो. त्यांना विचारल्यावर कळले की ते ह्या आधीच्या बाईक वरून लिफ्ट मागून पुढे आले. रस्त्यात सूशील, किशोर आणि जयवंत यांना पिक-अप करून आम्ही गाडी श्री बल्लाळेश्वर मंदिराजवळ वळविली. गाडी पार्किंग ला लाऊन आम्ही जरा फ्रेश झालो आणि मंदिराच्या दिशेने निघालो. त्या दिवशी मंदिरात भाविकांची गर्दी जरा जास्तच होती. एकतर रविवार, सुट्टी चा दिवस आणि त्यात संकष्टी चतुर्थी, म्हणजेच बाप्पा चा दिवस त्यामुळे. साधारण अर्धा-पाऊण तासानंतर आम्हाला श्री बल्लाळेश्वर बाप्पाचे दर्शन झाले. बाप्पाचे दर्शन झाल्यावर मंदिरामागे असलेल्या तलावाजवळ थोडावेळ घालवून आम्ही मंदिराच्या आवारातून बाहेर पडलो. मंदिरातून बाहेर निघाल्यावर प्रत्येकाच्या पोटात कावळे ओरडू लागले होते मग आम्ही थेट हौटेलात गेलो  आणि तेथे जेवायला बसलो. जेवून झाल्यावर पुढचा टप्पा होता तो सरसगड.  महेश ने गाडी पार्किंग वरून काढून गावाच्या बाहेर रस्त्याच्या कडेला लावली. महेश आणि जयवंत दमल्या मूळे त्यांनी गाडीत झोपायचे ठरवले.
सरस गडावरी जाण्याकरिता कातळात खोदलेल्या पायऱ्या
पावसाचे सावट होते, आभाळ भरून आले होते, मध्ये मध्ये विजा ही चमकू लागल्या होत्या. पाऊस पडणार येवढी आम्हाला खात्री झाली. मी महेश ची सैंडल घेऊन सूशील, किशोर आणि चेतन सोबत सरसगड कडे निघालो. वाट तशी जंगलाची नसली तरी मांड्यांयेवढ्या झुडपांची होती. आम्ही गडाच्या पाऊलवाटा वरून चालू लागलो आणि पावसाने हजेरी लावली. भर पावसात भिजत आम्ही चालत होतो. जवळजवळ आम्ही पंचवीस-तीस मिनिटांनी गडाच्या पायरया जवळ पोहोचलो. गडाच्या पायऱ्या पूर्णपणे कातळात बनवलेल्या होत्या. सर्व प्रथम किशोर ने पाय-या चढायला सुरुवात केली. पाय-या चढून झाल्यावर आम्हाला समोर एक भुयार दिसली, त्याच्याच बाजूने गडाकडे दगडी पायऱ्या जात होत्या. भुयारीला बाजूला ठेवून आम्ही दगडी पायऱ्या चढायला सुरुवात केली. पायऱ्या गुडघ्या येवढ्या होत्या, चढताना आमच्या पायात गोळे येऊ लागले, तरी सुध्दा आम्ही पाय-या चढत होतो. काही क्षणातच आम्ही सरसगडाच्या दरवाजा पासी आलो. जसा गड तसा दरवाजा, पूर्णतः कातळात कोरलेल्या. आताच्या कारागीरांनी अगदी हुबेहूब नक्कल करण्याचा प्रयत्न केला तरीही कुठे तरी कमी राहील असा.

सरस गडाचे प्रवेशद्वार
पाऊस थांबला होता.वेळेच्या अभावी कारणांमुळे आम्हाला सरसगड लवकर उतरावा लागला. उतरताना प्रत्येकाच्या मनात थोडीशी भीती होती, कारण एकीकडे ओल्या आणि घसरत्या पाय-या तर दुसरीकडे खोल दरी. आम्ही हळूहळू गड उतरु लागलो. मी घातलेली सैंडल घसरत असल्यामुळे मला गड उतरायला अवघड जात होते. सुशील च्या म्हणन्यानूसार गडाला एकुण एकशे अकरा पाय-या आहेत. नुकताच पाऊस पडून गेल्यामुळे वाट थोडी घसरणारी झाली होती. मी आणि सुशील पडता पडता वाचलो. आम्ही काही मिनिटांतच पाली गावच्या मूळ रस्त्यावर आलो आणि गाडी जवळ गेलो. गाडी जवळ थोडे फोटो काढून आम्ही स्वप्नाच्या नगरीत रवाना झालो.
अशी आमची ट्रेक सफल झाली. कमी माणसात ट्रेकींगची एक वेगळीच मजा दिल्या बद्दल सुशील, चेतन, जयवंत, फोटोग्राफर आणि ड्राइवर महेश आणि आमचा गारदी किशोर यांचे आभार.   धन्यवाद मित्रांनो, पुन्हा भेटूया, पुढच्या वेळी पुढच्या ट्रेकला , तो पर्यंत आठवण काढत रहा. पुन्हा भेटूच……

Comments

Popular posts from this blog

Sankshi Fort

Rajamachi Trek

ढाक-बहिरीचा थरार