एका खेडेगावातील थंडीची सुखद चाहूल…..

एका खेडेगावातील थंडीची सुखद चाहूल…..

अशीच माझ्या गावातील सुंदर पहाट. ती पहाट जणु काही भव्यदिव्य करू पाहत होती. त्यात ते सकाळचे मनोहर दृश्य मनाला काहीतरी नवीन चैतन देत होते. मनाला आणि माणसाला हवाहवासा वाटणारा तो शिशिरातील महिना. त्यातच ते कोंबड्याचे बांग देऊन सगळ्यांना जागे करण्याचे काम. शहरातील आणि गावातील थंडीमध्ये खूपच फरक जाणवतो. तसे पण ते गावातले लोक पण कोंबडा आरवण्याचा आधीच उठलेले असतात,आणि आपआपले दिनक्रम उरकायच्या मार्गाला लागले असायचे. हळूच बाजूच्या घरातून लहान मुलाच्या रडण्याचा आवाज येत असायचा,त्यातच आम्ही त्या थंडीतून लहानपणी शाळेला जात असोत,त्यावेळी आम्हाला उठायचा खूपच कंटाळा यायचा, तरीही त्याच कुडकुडत्या थंडीतून आम्ही सगळी भावंडे अंगावर गरम पाणी घेत असत,त्यानंतर गरमागरम चहा ओठाला लावताच ती थंडी कुठल्या कुठे पळून जायची,त्यानंतर आई आम्हाला स्वेटर घालून शाळेत पाठवायची,घरातून पाय ठेवल्यावर ती थंडी पूर्ण अंगात शहारे उठून आणायची. आम्ही शाळेत जाताना वाटेतच आम्हाला छोटी नदी लागायची. काय ते त्या नदीवरच्या खळखळनाऱ्या पाण्यावर सकाळी मनाला थक्क करणारे दृश्य असायचे,त्या नदीवर त्या दवबिंदूनी जसे काही अधिराज्य गाजवले असावे असे सुंदर नयनरम्य असे दृश्य असायचे. जसे काही त्या नदीवर ढगच ओसरले असावे असे चित्र कुणी एका चित्रकाराने काढले असावे असे जणू वाटत होते.याच गुलाबी थंडीत त्या सगळ्या हिरव्याशार गवतांवर पानांवर दवबिंदूनी आपले वेगळेच असे अनोखे रूप दाखवण्यात गुंग झाले होते. जणू काही या निसर्गाने या धर्तीवर रांगोळीचा सडा पाडला असावा. त्याला साथ म्हणून वाऱ्याची हलकी झुळुक येत जात होती.त्यातच सूर्याचे देखील पाठी मागील डोंगरामधून डोकावणे आता थोडेसे दिसू लागले होते त्यातच त्या मधुर अशा पक्ष्यांचा किलबिलाट कानांना सुखद असा अनुभव देत होता. समोरून त्या गवतांवर पानांवर पडलेले आता ते दवबिंदू आता जणू काही सोन्यासारखे भासत होते. समोरून काही गावातल्या आयाबायाका पाणी भरण्यासाठी विहिरीवर जात होत्या. काही माणसे आपल्या गुरांना घेऊन त्यांना नदीवर त्यांना पाणी पाजण्यासाठी नेत होते.कूणीतरी कुठे तरी सरपण जाळले असल्यामुळे त्याचा धूर त्या दवामध्ये मिसळला जात होता त्या मुळे निसर्ग पूर्णतः न्हाहून निघाल्यासारखा वाटत होता.
अशीच ती सकाळ परतपरत अनुभावायली मिळावी आणि तेच बालपण पुन्हा यावे. परत तीच शाळा,तेच घर,तेच अंगण,तेच जुने मित्र,आणि तीच ती त्याच गुलाबी थंडीतील गरमागरम चहाचा पेला हातात घेऊन तीच सकाळ पुन्हा भेटू दे,तेच दवबिंदू परत पाहता यावे यासाठी तुम्ही सुधा या गुलाबी थंडीचा अनुभव घ्यायला आपापल्या गावी जाऊन या.…. शुभ सकाळ……
Untitled9

Comments

Popular posts from this blog

Sankshi Fort

वासोटा एक अभूतपूर्व प्रवास

ढाक-बहिरीचा थरार